गृहभेटीतून लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा – छगन भुजबळ

नाशिक – सण, उत्सवाच्या काळानंतरही रूग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे, परंतु धोका पूर्णत: टळलेला नाही. या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागात लसीकरणाचे काम गृहभेटी देऊन वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणा व उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत.

येवला संपर्क कार्यालयात आयोजित येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, महावितरणचे उप अभियंता विनायक इंगळे, राजेश पाटील, उमेश पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. जितेंद्र डोंगरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, अरुण थोरात, दिपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शहरात अजूनही 50 टक्के लोकांचे लसीकरण बाकी आहे. लसीकरणाची ही टक्केवारी लक्षात घेता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य यत्रंणेबरोबरच शहरातील नगरसेवकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. नगरपालिका व वैद्यकीय यंत्रणा यांनी समन्वयाने शहरातील लसीकरण न झालेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरणामुळे कोरोनाच्या महामारीला नियंत्रणात ठेवता येणे शक्य आहे, त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर कठोर उपाययोजना कराव्या लागतील, असे सुतोवाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गृहविलगीकरणातील रुग्णांची आरोग्य यंत्रणेने प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून या रुग्णांमार्फत संसर्ग वाढणार नाही, यासाठी अशा रूग्णांना त्वरीत रूग्णालयात दाखल करावे. ऑक्सिजनच्या बाबतही आता जिल्ह्यातील रूग्णालये स्वयंपूर्ण झाली आहेत. कोरोना अद्यापही संपलेला नाही. शहरात स्वच्छतेबरोबरच मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे नागरिकांनी काटकोरपणे पालन करणेही तितकेच गरजेचे असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत निधीचे त्वरीत वाटप करावे

अतिवृष्टीबाधितांना नुकसान भरपाई म्हणून येवला व निफाड तालुक्यांसाठी 41 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील 38 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप  शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले असून उर्वरित निधीचे वाटपही त्वरीत करण्याच्या सुचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –