नारळाची एक वर्ष वयाची, आखूड व जाड बुंधा असलेली, पाच ते सहा पानावरील, निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. दोन ओळी व झाडांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने नारळ लागवड करताना ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवावे. बुटक्या जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.
जातींची माहिती :
उंच जाती :
- वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) :या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात.
- लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) : झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते.
- प्रताप : नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. एका झाडापासून १५० नारळ मिळतात.
- फिलिपिन्स ऑर्डिनरी : नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी २१३ ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन ९४ ते १५९ असून, सरासरी १०५ नारळ आहे.
ठेंगू जाती :
झाडे उंचीने ठेंगू व लवकर (लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी) फुलोऱ्यात येतात. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.
संकरित जाती :
- टी × डी (केरासंकरा) : ही झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. प्रति झाड सरासरी १५० नारळ मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण ६८ टक्के असते.
- टी × डी (चंद्रसंकरा) : फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे सरासरी उत्पादन ११६ फळे आहे.