रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते.
शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतूनाशके न वापरता निव्वळ सेंद्रीय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि या उपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो माल परत पाठवला जातो. या बाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोचत असतात.
याबाबत पंजाबमध्ये दोन विदारक अनुभव आले आहेत. पंजाबमध्ये सर्वत्र समृद्धी असल्यामुळे आणि ९५ टक्के जमीन बागायती असल्यामुळे सगळे शेतकरी सधन आहेत आणि ते आपापल्या शेतात राबत असतात. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणाऱ्या या बायका तिथे आढळतच नाहीत. मग ही कसर भरून काढण्यासाठी बिहारमधले मजूर पंजाबमध्ये कामाला जातात. तेही मिळाले नाहीत तर पिकांमध्ये आलेले तण काढणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. तशी स्थिती आल्यास विषारी तणनाशकांचा मारा करून तण नाहीसे केले जाते. या विषारी तणनाशकाचे अंश गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये उतरलेले असतात. तो गहू खाणाऱ्याच्या रक्तात सुद्धा ते उतरतात. त्यामुळे रोपाड जिल्ह्यात काही तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तामध्ये या तणनाशकाचे अंश सापडले आहेत.
आपण आपले रक्त या दृष्टीने तपासत नाही म्हणून ठीक आहे. परंतु आपण तसे ते तपासायला लागलो तर त्या तपासणीचे निष्कर्ष धक्कादायक ठरणार आहेत. पंजाब मधल्याच संगरूर या जिल्ह्यामध्ये जमीनधारणा कमी आहे. तिथे दहा एकराचा शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी असा मानला जातो. सर्वच शेतकरी लहान असल्यामुळे तिथे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे पीक घेतले जाते. या कापसावर मारलेली जंतूनाशके जमिनीत उतरतात. पंजाबमध्ये भूमी अंतर्गत पाण्याची पातळी खोल गेलेली नाही. त्यामुळे जमिनीत उतरलेली ही जंतूनाशके पाण्यात मिसळतात. अशा रितीने संगरूर जिल्ह्यातले पाणी सुद्धा विषमय झालेले आहे आणि हे पाणी प्यायल्यामुळे संगरूरच्या लोकांमध्ये कर्करोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.
संगरूर जिल्ह्याच्या बाहेर इतरत्र कर्करोग होणार्यांचे प्रमाण लाखात एक किंवा दोन एवढे असते. परंतु संगरुर जिल्ह्यात हे प्रमाण लाखात दहा एवढे झालेले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर संगरुर शहराला भारताची कॅन्सरची राजधानी असे म्हटले जाते. रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकांचे परिणाम एवढे गंभीर असतील तर आपण त्याच खतांचा आणि जंतुनाशकांचा वापर करण्याचा अट्टाहास का करत आहोत, हा प्रश्न पडतो. ज्या लोकांना या परिणामांची जाणीव झाली आहे ते लोक मात्र सावध झाले आहेत आणि शक्यतो सेंद्रीय शेतीत तयार झालेला माल वापरला पाहिजे हे त्यांच्या लक्षात यायला लागले आहे.
भारतात सुद्धा येत्या काही वर्षात असे घडण्याची शक्यता आहे. सेंद्रीय माल थोडा महाग मिळाला तरी हरकत नाही परंतु तोच खाल्ला पाहिजे, असा अट्टाहास करणारे लोक आता दिसायला लागले आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीतील मालाला यापुढच्या काळात चांगली मागणी राहणार आहे. सेंद्रीय शेतीच अधिक उपयुक्त ठरणार आहे.
उत्पादनवाढीच्या उद्देशाने आपण भरपूर उत्पादन देणार्या जाती शोधून काढल्या आहेत. त्यांचे उत्पादन भरपूर होते, परंतु त्या उत्पादनाची नैसर्गिक चव गेलेली असते आणि त्यातले सत्वही कमी झालेले असते. ही गोष्ट आता सर्वांना लक्षात आलेली आहे. कोणत्याही खाद्य पदार्थाला स्वत:ची अशी एक चव असते. मात्र आपण रासायनिक शेती करायला लागलो की, ती चव हरवली जाते. नुकतेच भारतामध्ये अमेरिकेतल्या शेती तज्ञांचे एक शिष्टमंडळ येऊन गेले. या शिष्टमंडळाने भारतातल्या जुन्या काळात वापरात असलेल्या काही भाज्यांची चव बघितली. ती नैैसर्गिक चव गमावून आपण आता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा वापर करत आहोत.
त्यामुळे त्या भाज्यांना आणि अन्नपदार्थांना भरपूर मसाले टाकून कृत्रिमपणे चव आणावी लागते. त्यामुळे सगळ्याच भाज्या एकाच चवीच्या लागतात. त्याशिवाय जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या अन्नातील सत्वही कमी झालेले असते. या साऱ्या दुष्परिणामांपासून बचावण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेल्या आयत्या खतांचा वापर करायचा आहे. या आयत्या खतांनाच आपण सेंद्रीय खत असे म्हणत असतो.
महत्वाच्या बातम्या –