बुलडाणा – जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल मंडळात (65 मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान) अतिवृष्टी झाली. तसेच जिल्ह्यात या कालावधीत बऱ्याच भागात सततचा पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाला व ओढे यांना पुरही आले. परिणामी, नदीकाठच्या शेतात पाणी साचून किंवा शेतातील पाण्याचे निचरा न झाल्यामुळे तसेच पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे देखील शेती पिकाचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत यंत्रणांनी पंचनामे केले, तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आदेश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. त्यानुसार पंचनामे करण्यातही आले.
कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात माहे जून ते सप्टेबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करुन शासनास अहवाल सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये माहे जुलै 2021 मध्ये चिखली, मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यातील जमीन खरडून गेलेल्या 287.95 हेक्टर करीता रु. 1.08 कोटी रक्कम शासनाकडुन प्राप्त होऊन 434 बाधीत शेतकऱ्यांना वाटप झालेले आहे. तसेच माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 133755.82 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. या बाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे. याकरिता रक्कम रु. 91.24 कोटीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. माहे ऑक्टोंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजीत नुकसानीच्या अहवालानुसार 97560 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. याबाबत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्ह्यातील 734722 लागवडीखालील क्षेत्रा पैकी अतिवृष्टी व पुरामुळे एकूण 132643 शेतकऱ्यांचे 136208 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. सततच्या पावसामुळे 155005 व माहे ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजित अहवालानुसार 97560 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे, असे जिल्ह्यातील एकूण 388773 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून एकूण लागवडी खालील क्षेत्राच्या 53 टक्के क्षेत्र बाधित झालेले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच बाधित शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत यंत्रणांकडून सातत्याने आढावाही घेण्यात आला. त्यामुळे एक विशिष्ट तालुका, गाव, परिसरातील नुकसान ग्रस्त भागच पंचनामा करू नये, असे होवू शकत नाही. यासंदर्भात अपप्रचार केल्या जात असून खोटी माहिती देण्यात येत आहे. तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा मदतीवर शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील कुणीही नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. शेतकरी बांधवांनी अशा खोट्या माहिती व अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी प्रशासना सोबत रहावे. प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठा दिलासा: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
- पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरकुल – नितीन राऊत यांची घोषणा
- पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याचा लवकरच निर्णय घेण्यात येणार – वर्षा गायकवाड
- शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – हसन मुश्रीफ यांची माहिती
- कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे