लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे.
लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन लागवडीस योग्य असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ असावा. चुनखडीविरहीत क्षाराचे प्रमाण ०.१ टक्यापेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच रेताड, खडकाळ जमिनीत लागवड करू नये.
लागवड –
- लागवडीपूर्वी जमीन उभी-आडवी नांगरट करून व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
- लागवड चौरस पद्धतीने ६ x ६ मीटर अंतरावर १ x१ x १ मीटर आकारचे खड्डे खोदावेत.
- चांगली माती किंवा पोयटा ४ ते ५ घमेली शेणखत, १ किलो निबोंळी पेंड, दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिश्रणाने खड्डे भरावेत,
सुधारीत जाती –
साई शरबती
- चौथ्या वर्षी प्रथम फुलोरा.
- स्थानिक आणि प्रचलित जातींपेक्षा फळांचे उत्पादन जास्त.
- फळे किंचित लंबगोलाकार व सरासरी ५० ग्रॅम वजन, पातळ साल, रसदार, कमी बी असलेली व चमकदार पिवळा रंग.
- खैऱ्या रोग आणि ट्रीस्टाझा या विषाणूजन्य रोगांस सहनशील.
फुले शरबती –
- तिसऱ्या वर्षी प्रथम फुलोरा.
- फळ धारणा दिवस १५०-१७०.
- वाढ जोमाने, लवकर फळधारणा, उन्हाळ्यात जास्त फळे.
कीड व रोगास कमी बळी पडणारी जात.
रोपांची निवड –
- राज्यात लिंबाची लागवड बियांपासून केलेली रोपे लावून करण्याची शिफारस.
- रंगपूर लिंबू या खुंटावर डोळा भरून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरावीत, परंतु खुंट प्रमाणित असावा. वापरलेली डोळाकाडी आणि खुंट रोगमुक्त असावा.
- बियापासून केलेली रोपे लागवडीच्या वेळेस पूर्णतः रोगमुक्त असतात, म्हणून महाराष्ट्राच्या हवामानात बियांपासून तयार केलेली रोपे लावावीत.
- रोपे कृषी विद्यापीठाची रोपवाटिका किंवा शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावी.
लागवड –
- लागवड पावसाळी काळात करावी.
- रोपांच्या मुळांचे आकारमान व वाढ लक्षात घेऊनच खड्ड्यातील माती बाजूला करावी.
- रोपे मुळांना इजा होणार नाही अशा बेताने घट्ट दाबावीत.
- रोप लावल्यानंतर आळे करून लगेच पाणी द्यावे.
- रोप लागवडीच्या वेळी शेंड्याकडील ४ ते ५ पाने ठेवून बाकी सर्व पाने काढून टाकावीत.
- २.५ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात लागवड करण्यापूर्वी रोपे दहा मिनिटे बुडवावीत. त्यानंतर लागवड करावी.
लागवडीनंतरची काळजी –
- दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे, तसेच झाडांना वळण देणे आवश्यक आहे, परंतु पहिली दीड वर्ष कसलीच छाटणी करू नये.
- रोपे दोन वर्षाची झाल्यावर वळण द्यावे, त्यासाठी आवश्यक तेवढीच छाटणी करावी.
- पूर्ण वाढलेल्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून साधारणपणे ७५ सें. मी. पर्यंत सरळ असावे. या उंचीवर चोहोबाजूला विखुरलेल्या स्थितीत ३ ते ४ जोमदार फांद्या ठेवाव्यात.
- मुख्य खोडावर आलेली फूट अंकुर अवस्थेत असतानाच काढत राहावी.
- दाट झालेल्या व रोगट फांद्या आणि पाणसोट काढून टाकावेत.
- छाटणी केलेल्या जागेवर बोर्डाेपेस्ट (१० टक्के) लावावी.
- रोपांना नियमित पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन –
जोमदार वाढ आणि अपेक्षित उत्पादनासाठी नियमित खत पुरवठा आवश्यक आहे. हवामानाचा विचार केला असता जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात झाडांना नवीन पालवी येते, अशावेळी नियमित खतांचा पुरवठा करावा.
टीप –
पाचव्या वर्षापासून पुढे चौथ्या वर्षाची मात्रा कायम ठेवावी. याशिवाय जुलै व मार्च महिन्यात १०० ग्रॅम झिंक सल्फेट व १५० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
- उडीद पिक ; कमी कालावधीत जास्त उत्पादन
- जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासाठी बँकांना 15 जुलै ही अंतिम मुदत
- राज्यातील बारा जिल्ह्यांपैकी म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण ‘या’ जिल्ह्यात
- राज्यात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी