मालेगाव – कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत, कांदा पिकाचे तालुक्यातील क्षेत्र लक्षात घेता मोठ्या प्रमाणात कांदाचाळ उभारणी हाती घेणे गरजेचे असून यासाठी शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. असे आश्वासन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मनोहर बच्छाव, प्रमोद निकम, निळकंठ निकम, भावना निकम, संगमनेर येथील प्रगतिशील शेतकरी आशिष वाकचौरे यांच्यासह विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तालुक्यांतील पिक पध्दती समोर ठेवून त्यास शासकीय योजनांची सांगड घालावी. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर करावेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना समोर ठेवून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पुर्व तयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन कृषी योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
डाळिंब पीक प्रस्ताव सादर करावेत
यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, डाळिंब पिकाचे देखील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर तालुक्यात आहे. मनरेगातंर्गत फळबाग लागवडीत राज्याने उच्चांक गाठला असून यामध्ये भविष्यात निश्चितच वाढ होईल, मनरेगातंर्गत फळपिक लागवडीत राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असतांना तालुक्यातून मिळणार अल्प प्रतिसाद आत्मचिंतन करणारा आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी कुटूंब मनरेगातंर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र असतांना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करावे.
गतवर्षीच्या तुलनेत रोपवाटीकांचा लक्षांक वाढवून देण्यात आल्यामुळे बळीराजाला यातून नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, उद्यानविद्या क्लस्टर विकास कार्यक्रमातंर्गत डाळिंब पिकातील मुल्यसाखळी विकसीत करणे बाबत प्रस्ताव चार दिवसात राज्यशासनास सादर करावा, राजमाता जिजाऊ महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान, पीएम किसान योजना व पिक विमा योजनांबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- खुशखबर! जिल्ह्यातील शाळा ‘या’ दिवसापासून होणार सुरु
- ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम्’ योजना – धनंजय मुंडे यांची घोषणा
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज