अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झाला पाहिजे. जिल्ह्यातील गुटख्याचे एन्ट्री पॉईंट चिन्हीत करावेत. या पॉईंटवर पोलीसांनी नजर ठेवून कारवाई करावी. जिल्ह्यात गुटख्याची अवैध विक्री, वाहतूक होणार नाही, यासाठी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या दालनामध्ये पोलीस विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अति. पोलीस अधिक्षक महेंद्र बनसोड, सहायक आयुक्त स.द केदारे, पोलीस निरीक्षक बळीराम गिते आदी उपस्थित होते.

गुटखा विक्री, वाहतूकीची माहिती मिळण्यासाठी पोलीस विभागाप्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने खबऱ्यांचे जाळे विणण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, खबऱ्यांना योग्य बक्षीस देवून अवैध गुटखा विक्रीची माहिती घ्यावी. या माहितीची खातरजमा करीत धाडी टाकाव्यात. त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री, वाहतूक याविरोधातही मोहिम उघडावी. कुठल्याही प्रकारे अवैध धंद्यांवर आळा घालावा. गांजा तस्करी, विक्री यावरही कारवाई करावी. त्याचप्रमाणे शाळांपासून 200 मीटर अंतरावर तंबाखुजन्य पदार्थ विक्री करता येत नाही. या नियमांचे पालन करावे. नियमांनुसार शाळांच्या 200 मीटरच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करावी. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –