मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार – संदीपान भुमरे

मुंबई – राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच पंजाब राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंजाबचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग यांच्याशी सिट्रस प्रणाली राज्यात राबविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार असल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले.

या दौऱ्यात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ.कैलास मोटे, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, फलोत्पादन शेतकरी श्री. नंदलाल काळे, फलोत्पादन तज्ज्ञ भगवानराव कापसे यांच्यासोबत वसंत बिनवडे, संदीप शिरसाट, मनोज वानखेडे, सिद्धार्थ गायकवाड यांचा समावेश होता.

फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे म्हणाले, राज्यातील लिंबूवर्गीय फळे जसे मोसंबी, संत्री, लिंबू आदी फळांचे क्षेत्र वाढविण्यासाठी पंजाब दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. राज्यात संत्री या फळाचे क्षेत्र मोठे आहे. याचबरोबर मोसंबी फळ पिकाचे क्षेत्र वाढवून उच्चप्रतीचे उत्पादन तसेच या फळाची आधुनिक रोपे तयार करण्याकरिता पंजाबमधील तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे प्रशिक्षण याविषयी प्रत्यक्ष फळ पिकांच्या शेतात जाऊन पिकांची माहिती घेतली.

फळ पिकांचे उत्पन्न वाढविणे, बाजारपेठ निर्माण करणे, उच्चप्रतीची रोपे निर्माण करुन निर्यातक्षम फळांची निर्मिती करण्यावर भर देण्याकरिता पंजाबमधील सिट्रस क्लस्टरची पाहणी केली. पंजाबचे फलोत्दापन शेतकरी आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात आले, असे सांगून श्री. भुमरे म्हणाले, आपल्या राज्यातील विविध फळ पिकांची माहिती पंजाबच्या अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना  देण्यात आली. पंजाबचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग यांनी पंजाबमधील तंत्रज्ञान, प्रशिक्षण याविषयी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले.

श्री. भुमरे म्हणाले, मोसंबी या फळपिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पंजाबमध्ये राबविण्यात येणारे तंत्र आपल्या राज्यात राबविण्यात येणार आहे. संत्री फळाचे राज्यात संशोधन होऊन विकसित रोपे तयार होत आहे. संत्री पिकांसाठी जे उपक्रम राज्यात राबविण्यात येतात ते उपक्रम मोसंबी फळ पिकांसाठी राविण्यात येणार आहे. फळ पिकांसाठी संशोधन, उच्चप्रतीची रोपे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण, फळ पिकांसाठी प्रसिद्ध असलेले इतर राज्य आणि देशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी पंजाबमधील करतारपूर येथील सेंटर ऑफ एक्सलेन्स (व्हिजिटेबल), डोघरी येथील सेंटर ऑफ एक्सलेन्स (पोटॅटो), होशियारपूर येथील सेंटर ऑफ एक्सलेन्स सिट्रस आणि सिट्रस इस्टेट आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली.

या दौऱ्या दरम्यान झालेल्या बैठकीत पंजाबचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव सीमा जैन, फलोत्पादन विभागाचे सचिव गगनदीप सिंग आणि फलोत्पादन विभागाचे संचालक शैलेंद्र कौर यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या –