ठाणे – सुदृढ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चौरस आहार आवश्यक असतो, त्याप्रमाणेच विकाससुद्धा चौफेर आणि सर्वसमावेशक असावा, भविष्यातील गरजा ओळखून विकास कामांचे नियोजन करताना होणारी कामे ही सुबक, दर्जेदार आणि देखणी असावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
सिडकोच्यावतीने आयोजित केलेल्या एकदिवशीय सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिट (आभासी-व्हर्च्युअल) चा शुभारंभ व सिडकोने उभारलेल्या कळंबोली आणि कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार मनोज कोटक, आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे आदी मान्यवर डिजिटल माध्यमाद्वारे उपस्थित होते.
जनतेचे आशीर्वाद मिळवणारे कार्यक्रम
सिडकोने केलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आज आपण उपस्थिती लावलेले दोन्ही कार्यक्रम हे जनतेचे आशीर्वाद मिळवणारे कार्यक्रम आहेत. ठाण्यात टेंभीनाका येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रक्तदान सप्ताह असो किंवा आजच्या समर्पित कोविड केंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम. या दोन्ही कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी व्यक्त झाली आहे.
सिडकोनेही अत्याधुनिक व अप्रतिम सुविधा असलेल्या दोन कोविड आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण झाले आहे. ही दोन्ही केंद्रे स्वच्छ, आखीव-रेखीव व सर्व सुविधायुक्त आहेत. कोविड काळात महाराष्ट्रात जेवढ्या आरोग्य सुविधा निर्माण झाल्या त्या जगात इतर कुठेही झाल्या नसतील. ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
सिडकोला बळ देऊ
विकास करताना कोणत्याही गोष्टीला दिशा नसली तर तो विकास भरकटतो हे लक्षात घेऊन सिडकोने सर्वांशी संवाद साधत टाकलेले पाऊल खुप महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि गर्दी हे समीकरण आहे. मुंबईवरचा भार हलका करण्याचे काम नवी मुंबईने केले आहे. सिडकोने नवी मुंबई निर्माण करताना कौतुकास्पद काम केले आहे. रस्ते, पाणी, वाहतूक सुविधा, शाळा, गुंतवणुकदार यांचे मोठे जाळे इथे निर्माण केले आहे. या शहरात गुंतवणुकदारांना यावेसे वाटावे इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा इथे निर्माण व्हाव्यात, गुंतवणूकदारांबरोबर नागरिकांनाही हे शहर आपले आणि राहण्यायोग्य वाटावे यादृष्टीने सिडको काम करत असून राज्याच्या विकासासाठी पाहत असलेल्या सिडकोच्या या स्वप्नाला बळ देण्याची गरज आहे. हे बळ राज्य शासनाकडून मिळत राहील, अशी ग्वाहीही मुख्यमत्र्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- गूळ खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर