नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘या’ जिल्ह्यात अनुदान वाटपास सुरुवात

औरंगाबाद –  औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले होते, आता शासनाकडून  अनुदान मिळाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे  त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं दिसत आहे. यात दोन दिवसांत ३७ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५३ लाख ४९ हजार ४६२ रुपये जमा झाले. अजूनही ६ लाख ६६ हजार ९०० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया व पूर्ण होईल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान ७ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ५२४६५५.७१ हेक्टरातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम देखील हातून गेल्याने दुहेरी नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे. शासनाने पीक नुकसानीचे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप केले जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारपासून अनुदान वाटप सुरू झाले आहे.

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. तर अजूनही जिल्ह्यातील ६ लाख ६६ हजार ९०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणे शिल्लक आहे. दरम्यान आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून शंभर टक्के अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव या ३ तालुक्यांतच पीक नुकसानीचे अनुदान वाटप सुरू झाले आहे. तर सहा तालुक्यांतील ७ तहसील कार्यालयांमध्ये अद्याप अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरूच झालेली नाही. यात अप्पर औरंगाबाद तहसील, औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबाद या तहसील कार्यालयांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –