Share

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील – विश्वजीत कदम

सांगली – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अचानकपणे मोठा पाऊस झाल्यामुळे सरकारला नविन अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  या अडचणीवरही मात करण्यासाठी शासन सक्षम आहे. या संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना राज्य शासन आवश्यक मदत करेलच पण केंद्र शासनाकडूनही मदत मिळवून घेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम राज्य शासन करेल, असा दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी ‍दिला.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीचे सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी ‍मिरज तालुक्यातील सोनी, करोली एम, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, निमणी, नेहरूनगर, येळावी, पलूस तालुक्यातील बांबवडे व पलूस येथे पहाणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कृषि आयुक्त धीरजकुमार, कृषि संचालक (फलोत्पादन) कैलास मोते, कोल्हापूर विभागाचे कृषि सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विनायक पवार, मिरज तालुका कृषि अधिकारी प्रदीप कदम, तासगाव तालुका कृषि अधिकारी सर्जेराव अमृतसागर, मोहिम कृषि अधिकारी स्वप्नील माने, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोनामुळे शेतीला फटका बसला तर आता अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले. निसर्गात होणाऱ्या या बदलामुळे शेतीला वाचविणे ही काळाची गरज झाली आहे. शेतीचा शास्वत विकास करण्यासाठी याच्यावर फार गांर्भीयाने विचार करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आले आहेत. पंचनामे सुरू असून येत्या काही दिवसात राज्यस्तरावर कृषि खात्याच्या माध्यमातून मंत्रीमंडळाशी व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याचा विचार करू. गेल्या दीड ते दोन वर्षापासून आपण कोरोना महामारीला सामोरे जात आहोत. गेली वर्षभर अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य शासनाने मदतीचा हात म्हणून निधी उपलब्ध करून दिला आहे. बदलत्या हवामानाचा विचार करून पीकविमा योजनेमध्ये कायमस्वरूपी बदल करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सोनी गावातील संभाजी पाटील, अमोल माळी, करोली एम गावातील रामचंद्र पाटील, शिवाजी कोडक, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील भगवान शिंदे, अमोल संकपाळ तर  निमणी येथील दिलीप पाटील, निमणी नेहरूनगर येथील निलेश पाटील, येळावी येथील अनिल पाटील, पलूस तालुक्यातील बांबवडे येथील अरविंद जाधव व पलूस येथील युवराज भोरे या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेत जावून नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.

कृषि आयुक्त धीरजकुमार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकूण म्हणाले, द्राक्ष शेतीला दिलासा देण्यासाठी राज्य शासनासमोर सर्व परिस्थिती मांडण्यात येईल. त्याचबरोबर शेडनेट शेतीसाठी अनुदान उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. द्राक्ष बागेवर फवारण्यात येणाऱ्या औषधांची शेतकऱ्यांने खात्री करून घेवूनच वापर करावा. तरीही फसवणूक झाल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

महत्वाच्या बातम्या –

मुख्य बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon