मुंबई – अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत सोसायटीकडून यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरवली जाईल, असा विश्वास सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय विस्तार शाखेचे आज सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुंबईचे जिल्हा उपनिबंधक जे.डी. पाटील, सहकारी संस्था उपनिबंधक प्रशांत सातपुते, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश डांगे, मानद सचिव प्रकाश खांगळ, महाव्यवस्थापक रामचंद्र तावडे आदी उपस्थित होते.
93 वर्षांपूर्वी मुहुर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने नवी मुंबईत स्वतःची चार मजली इमारत उभी केली आहे. अनेक ठिकाणी शाखा स्थापन करुन एटीएम, मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या खातेदारांना सेवा उपलब्ध करुन दिली. कोरोनाच्या काळात या सोसायटीमधील कर्मचाऱ्यांनी दर्जेदार सेवा पुरवून आपले कर्तव्य बजावल्याबद्दल सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सोसायटीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री. डांगे यांनी तर मानद सचिव श्री.खांगळ यांनी आभार मानले.
महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीविषयी….
10 मे 1929 रोजी जुने सचिवालय येथे 100 शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. मंत्रालय, कोकण भवन, कुर्ला, गोरेगाव आणि पालघर येथे सोसायटीच्या शाखा असून सुमारे साडेपाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बॅंकेचे सभासद आहेत. पावणे दोनशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या सोसायटीने सभासदांसाठी एसएमएस, मोबाईल ॲप, संकल्प भवन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सोसायटीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10 लाख रुपयांचे आर्थिक योगदान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा
- राज्याला पावसाचा मोठा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- ‘या’ जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार – वर्षा गायकवाड
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
- राज्यातील या जिल्ह्यांमध्ये २ दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा अंदाज