पीक विमा काढूनही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले. विशेष म्हणजे ज्या सीएफसी सेंटरद्वारे त्यांनी पीक विमा काढला होता, त्या सेंटरने ओरड केल्यानंतर पीक विम्याचा भरलेला हप्ता परत केला.

त्यामुळे या शेतकºयाला पीक विमा काढूनही नुकसान भरपाई मिळू शकली नाही. सचिन वाट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी आहेत. मौजा मालापूर येथे त्यांची साडेतीन एकर शेतजमिन आहे. त्यांनी आपल्या शेतात कापूस आणि सोयाबीन पीक घेतले होते. त्यांनी पीक विमाही काढला. गावातील एका सीएससी सेंटर मधून त्यांनी २३८० रुपये विमा हप्ता ऑनलाईन भरला. त्याची पावतीही त्यांना मिळाली. पुढे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही.

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पैसेच मिळाले नाही, पंचनामे करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर सीएससी सेंटर चालकाने पैसे परत आल्याचे सांगितले. त्यांना दोन महिन्यानंतर याची माहिती देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. यामुळे वाट यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. तसेच नुकसानही झाले, असा प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.