मालेगाव – सुमारे एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासह प्रतितास 2 मेट्रिक टन क्षमतेचे धान्य चाळणी यंत्र उभारणी करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मालेगाव बाजार समितीमार्फत झाले आहे. ही बाजार समिती संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशव्दाराच्या उद्घाटनासह गोदाम व चाळणी यंत्राचा लोकार्पण सोहळा मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते पार पडला यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, उपमहापौर निलेश आहेर, सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, प्रसाद हिरे, संजय दुसाणे, राजाराम जाधव, मधुकर हिरे प्रमोद शुक्ला यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, बाजार समितीमधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरणासह पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पाणी आणि चिखलाचा निचरा होण्यासाठी कामे तात्काळ करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा. तालुक्याच्या इतरही भागांमध्ये बाजार समितीची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले असून तालुक्यासाठी जवळपास 43 कोटीचे अनुदान जिल्हा बँकेकडे वर्ग केले आहे. पैकी 36 कोटीचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असून अद्याप 7 कोटीचे अनुदान हे शेतकरी बांधवांचे बँक खाते उपलब्ध नसल्यामुळे पडून आहे. अशा वंचित शेतकऱ्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्याचे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते नाहीत अशा शेतकऱ्यांना खाते उघडण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचनाही जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील बेरोजगारांच्या हातांना मिळणार काम
अजंग येथील एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगारांच्या हातांना काम मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून अल्पदरामध्ये प्लॉट उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने तालुक्यातील उद्योजकांना याचा नक्कीच लाभ होईल. पाईप बंद कालव्यामुळे सध्याच्या सिंचनक्षेत्रात चार पटीने वाढ होवून तालुक्यातील शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल. गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजना राबविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी यावर लक्ष केंद्रीत करावे. घरातील महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा कारण, महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना राखीव ठेवण्यात येणार असल्याने याला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.
डाळिंब परिसंवादामध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाही होण्याचे आवाहन
कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सातमाने येथील डाळिंब उत्पादक शेतकरी रविंद्र पवार यांच्या शेतशिवारात रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता डाळिंब पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यासह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब परिसंवादामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.
सर्वप्रथम राष्ट्रपुरुषांचे प्रतिमापुजनासह दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. प्रस्तावनेतून बाजार समितीच्या उपक्रमाबाबत माहिती देतांना सभापती राजेंद्र जाधव यांनी मार्केटमध्ये मका आणतांना वाळवून आणावा असे आवाहन करत बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडते. बळीराजाला अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बाजार समिती कटिबध्द असल्याची ग्वाही सभापती श्री.देवरे यांनी यावेळी दिली. तर तालुक्यातील इतर भागातील बाजार समित्यांना उपबाजार समितीचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करतांना आमदार सुहास कांदे म्हणाले, मालेगाव बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना ज्या सेवा आणि सुविधा दिल्या जात आहेत त्या नक्कीच कौतुकास पात्र असून भविष्यात उप बाजार समित्या तयार केल्यास शेतक-यांना नक्कीच दिलासा मिळेल.
यावेळी प्रसाद हिरे व वारकरी संप्रदयाचे श्रावण महाराज यांनी मनोगत व्यकत केले. तर आभार संजय दुसाणे यांनी मानले.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे 3 दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस कोसळणार
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज
- राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस