जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण मोहीम गतिमान करा – दादा भुसे

मुंबई – पालघर जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून उपाययोजना कराव्यात आणि लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी, अशा सूचना कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

कृषीमंत्री तथा पालकमंत्री श्री.भुसे यांनी  मंत्रालयात संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत करावयाच्या उपाययोजना, वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत  संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. खासदार राजेंद्र गावित, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह इतर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.भुसे म्हणाले, सध्या आपण जिल्ह्यातील विविध बाबी पूर्ववत सुरु केल्या आहेत. मात्र, त्यामुळे पुन्हा कोविड-19 प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतली पाहिजे. त्यादृष्टीने कोविड-19 लसीकरण मोहिमेस गती द्यावी. सध्या पहिल्या लशीचा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 64 टक्के आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यात उद्योग आस्थापना सुरु आहेत. संबंधित उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण झाले किंवा नाही, याची खातरजमा करुन उर्वरित कामगारांसाठी लसीकरण सत्र घेण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात कोविडचा प्रादुर्भाव खूपच कमी झाला आहे, ही चांगली बाब आहे. मात्र अद्यापही वसई-विरार नागरी भागात कोविड रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोविड केअर सेंटर अद्ययावत करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सज्जता ठेवावी. ऑक्सीजन प्रकल्प वेळेत सुरु करता येतील याचे नियोजन ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक सोईसुविधांसाठी अडचण जाणवणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी केल्या.

जिल्ह्यातील शाळा सुरु होत आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालघर येथील जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची तरतूद केली असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री.गुरसळ यांनी दिली. त्यावर याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची सूचना श्री. भुसे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –