नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार

अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस हा भिजला. कापूस भिजल्यामुळे ओलाव्याचे प्रमाण हे जास्त राहिले आहे. तसेच यावर्षी नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोलीत ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. कापूस भिजल्याने परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते अडीच हजार रुपये कमी दराने त्याची खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मध्यम धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार २५५ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ५५० रुपयांचा दर हमीभावानुसार जाहीर करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपयांनी कमी होते. परंतु, त्यानंतर बोंडातून फुटलेला कापूस पावसात भिजल्याने सरकीला मोड फुटले. मोड फुटल्याने कापसाचे धागे हे पिवळे पडले आणि त्याचा दर्जा खालावला. सर्व वेचलेला कापूस हा उन्हात वाळवावा लागत आहे. आणि त्या वाळलेल्या कापसामुळे त्याच्या वजनात घट येत आहे. यामुळे सर्वच बाजारापेठांतील किरकोळ व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळतो आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलाव पध्दतीने, तसेच कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही.

खुल्या बाजारातील दर कमी असल्यामुळे पणन महासंघाच्या खरेदीला यावर्षी प्रतिसाद मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. पणन महासंघातर्फे नांदेड जिल्ह्यात भोकर आणि तामसा, परभणी जिल्ह्यांत गंगाखेड, हिंगोली जिल्ह्यांत हिंगोली येथे खरेदी केंद्र प्रस्तावित आहेत. तसेच अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटानंतर आता कमी दराचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या –

मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर  ७०.८४ टक्‍क्‍यांवर

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर 5,400 कोटींचा खर्च

हे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……