महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ची निर्मिती करा – सुभाष देसाई

औरंगाबाद – प्रशिक्षणार्थींना नवनवीन कल्पना घेऊन उद्योग विकसित करावयाचा असतो. उद्योग, व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन आवश्यक असते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात येते. त्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींसमोर काही अडचणी असतात. त्या सोडविण्याचे व उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून होण्यास मदत होते.  त्यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणीच जिल्हानिहाय इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (subhash Desai)यांनी उद्योग विभागाला केल्या.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उद्योजक निवास येथे बांधण्यात आलेल्या विस्तारीत वस्तीगृह आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मंत्री देसाई यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मंत्री देसाई यांनी इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल,  अतुल सावे,  उद्योग विभागाचे विकास आयुक्त तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विकास केंद्राचे कार्यकारी संचालक बा.त्रिं. यशवंते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात मंत्री देसाई यांच्याहस्ते निर्यातदार मार्गदर्शक पुस्तिका आणि उद्योजकता‍ विकास केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथा पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. तर नागपूर येथील अगरबत्ती क्लस्टरबाबत सविस्तर माहिती ऑनलाईन स्वरूपातून मंत्री सुभाष देसाई (subhash Desai) यांना देण्यात आली.

पालकमंत्री सुभाष देसाई (subhash Desai) म्हणाले, औरंगाबादच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून 2019 वर्षात 80 हजारांवर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसायही सुरू केले आहेत, याचा आनंद आहे. औरंगाबादमधील या प्रशिक्षण केंद्रांमधील सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचे समाधान मिळून प्रशिक्षणाचा व्यवसाय वृद्धीसाठी लाभ हाईल. या केंद्रामध्ये 300 प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाची तर 100 प्रशिक्षणाची निवासी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.  जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या विकास केंद्राच्या वस्तीगृह बांधण्यासाठी मदत केली आहे. राज्यात इतर ठिकाणी उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यासाठी महामंडळ पूर्ण सुविधा उपलब्ध करून देईल. मात्र, केंद्र चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक कंपन्‌यांनी पुढाकार घ्यावा. त्यातून उद्योग वाढतील. सर्व प्रशिक्षणार्थींना कुशल बनविण्याचे ध्येय शासनाचे असून यामध्ये उद्योजकता विकास केंद्र मोलाची भूमिका पार पाडत असल्याचे गौरवोद्गारही मंत्री देसाई यांनी काढले. ठाणे येथे आंतरराष्ट्रीय आणि कळंबोली येथे राज्य पातळीवरील प्रशिक्षण केंद्रांमुळे प्रशिक्षणाची सोय प्रशिक्षणार्थींना झाल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

डॉ. कांबळे यांनी उद्योजकता विकास केंद्राची वाटचाल आणि आगामी प्रकल्पांबाबत माहिती दिली. औरंगाबादेत उद्योजकतेला पोषक वातावरण असून जागतिक पातळीवरील प्रशिक्षणाची सोय याठिकाणी झाल्याने उद्योजकांमध्ये वाढ होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक सुरेश लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे यांनी केले. आभार यशवंते यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या –