सोलापूर – जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 470 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी 10 लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 15 लाख असा एकूण 625 कोटी 25 लाखाचा जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी सर्व संबंधित यंत्रणांनी विहित कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यावर्षीही कोरोनासाठी राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. तरीही जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील विकासाची नोंद घेऊन त्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेची हद्दवाढ झालेल्या भागातील जिल्हा परिषदेच्या 36 शाळांच्या दुरुस्ती करीता पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे सांगून उर्वरित निधीही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज वितरण कंपनीने कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची वीज जोडणी खंडित करू नये असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकी बाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची ऊर्जा मंत्री यांच्याकडे मुंबई येथे पुढील दोन दिवसांनी बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांना विनंती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना काळात कोविड सेंटर मध्ये काम केलेल्या व आज पर्यंत मानधन मिळाले नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित मानधन मिळण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. कोरोना काळात सर्वांनी चांगले काम केले असून रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजून करून गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. राज्यात ऑक्सिजन निर्मिती सोलापूर जिल्हा स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा आहे, अशी माहिती श्री. भरणे यांनी यावेळी दिली.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ पिक कर्ज पुरवठा केला पाहिजे असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिले. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरु असलेल्या कामाविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने एकंदरीतच स्मार्ट सिटी कामाच्या गति बाबत पुढील पंधरा दिवसात एक स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन या अंतर्गत च्या सर्व कामांना गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वीज वितरण कंपनीने थकबाकी अभावी वीज जोडणी तोडू नये असे सूचना केली तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जाचे वाटप तालुका निहाय करावे असे सांगितले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गौण खनिजाचा जिल्ह्याचा तीन कोटीचा निधी असून सदरील निधी वाटपाबाबत पालकमंत्री च्या अध्यक्षतेखाली समिती असून त्या समितीकडून निधी वाटपाबाबत निर्देश देण्यात येतील असे सांगितले. तसेच जिल्ह्यात प्रशासनाकडून विविध ठिकाणी जप्त केलेली वाळू घरकुलाच्या कामासाठी देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही श्री शंभरकर यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दराडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 खर्चास मान्यता देणे, सन 2021-22 चा खर्च, मागील बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन या विषयाची माहिती बैठकीत सादर करून त्यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, संजय शिंदे, शहाजीबापू पाटील, यशवन्त माने, समाधान औताडे, राजेंद्र राऊत सह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
सन 2020-21 च्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीकडून सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 574.12 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेच्या 421.99 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना च्या 151.38 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 75 लाख अशा एकुण 574 कोटी 12 लाखाच्या खर्चास समितीने मान्यता प्रदान केली.
विविध ठरावांना मंजुरी
ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने राज्यस्तरावरून शासनाने योजना जाहीर करावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.
तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल समिती सदस्यांनी पालकमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.
लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांच्या सूचना
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात वीज, रस्तेदुरुस्ती, पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करणे, पीक कर्ज वाटप, रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित करणे, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत चे कामे गतीने होणे, समशान भूमी ची कामे होणे तसेच विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी बाबत मागण्या व सूचना करून त्या वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न – अशोक चव्हाण
- अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे
- मोठा दिलासा: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
- काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….
- कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे