उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणावर भर – नवाब मलिक

पुणे – राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेत काळानुरुप अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत आहे. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

औंध येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या नवीन लॅबचे उद्घाटन श्री. मलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, पुणे विभागाचे सहसंचालक यतीन पारगांवकर, प्राचार्य बी.आर. शिंपले, थायसन कंपनीचे संचालक विवेक भाटिया उपस्थित होते.

श्री. मलिक म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण व त्यासोबतच शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणे गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. अनेक नामांकीत संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत.  कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील आयटीआयने काम करावे, यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना ‘ऑन जॉब ट्रेनिंग’  उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल.  हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही श्री. मलिक म्हणाले.

खाजगी उद्योग समूहाच्या प्रतिनिधीसोबत चर्चा

खाजगी उद्योग समूहाच्या प्रतिनिधीसोबत मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी चर्चा केली. उद्योग क्षेत्रात सद्यस्थितीत मनुष्यबळाची गरज, कुशलमनुष्यबळ निर्मिती आदींसह विविध विषयावर चर्चा झाली. उद्योग समूहांच्या प्रतिनिधीनीही अनेक उपक्रमात सहभाग घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत वेल्डींग वर्कशॉप

थायसेनकृप इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून औंध येथील आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत वेल्डींग वर्कशॉप उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही मंत्री श्री.मलिक यांच्या हस्ते झाले. या वेल्डींग वर्कशॉपच्या माध्यमातून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होईल.

यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, पुणे विभागाचे सहसंचालक यतीन पारगांवकर, प्राचार्य बी.आर. शिंपले, थायसन कंपनीचे संचालक विवेक भाटिया यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंत्री श्री मलिक यांनी संगणक लॅब, फोटोग्राफी विभाग, यांत्रिक प्रशिक्षण, तांत्रिक विभाग आदींसह विविध विभागांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख निदेशक, विद्यार्थी, कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –