अमरावती – निरीक्षणगृह व बालगृहातील मुलींनी प्रशिक्षण घेऊन कल्पकता व मेहनतीच्या बळावर सुंदर कलात्मक वस्तू तयार केल्या. या मुलांच्या कौशल्यांचा विकास घडवणे, मानसिक बळ व सकारात्मकता वाढविणे यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर हाती घेतला. ही प्रायोगिक तत्वावरील तथापि, महत्वपूर्ण सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल व यादृष्टीने राज्यस्तरावर धोरणही आखण्यात येईल , असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
शासकीय मुलीचे निरीक्षणगृह व बालगृह येथील विद्यार्थिनींनी हस्तकलेद्वारे तयार केलेल्या उत्तमोत्तम वस्तूंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा शुभारंभ आज सकाळी बचतभवनात झाला. हे प्रदर्शन उद्याही खुले राहील. जि. प. महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले,
अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, महिला व बालविकास उपायुक्त शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे, बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री कोलखेडे, अतुल भडंगे, दिलीप काळे, विधी अधिकारी सीमा भाकरे, अनिरुद्ध पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हयात कोविड-१९ ने दोन्ही पालक मृत्यु पावलेल्या १० अनाथ बालकाना प्रत्येकी ५ लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या कौशल्य विकासाला वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. येथील मुलांना आठवड्यातून एकदा तरी खुल्या वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी पुरेशी सुरक्षितता व मैदाने, बाग आदी सुविधा असलेल्या सीआरपीएफसारख्या कॅम्पसमध्ये भेट अशाप्रकारचा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. महिला व बालविकास विभागाकडून जिल्ह्यात महिला व बालविकास भवन सुरू करण्यात आले. वर्किंग वूमन हॉस्टेल सुरू करण्यात येत आहे. महिला नागरिकांच्या सोयीसाठी महिला आयोग व बालहक्क आयोगाचे कार्यालय विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री. शिंगणे म्हणाले की, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर येथील निरीक्षणगृह व बालगृहातील विद्यार्थिनींना ‘आर्ट अँड क्राफ्ट’चे २ महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. संस्थेतील प्रवेशिताच्या कलागुणाना वाव मिळावा तसेच त्यांना भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
गत दोन वर्षांपासून महिला व बालविकास विभागाकडून अनेक महत्वपूर्ण राबविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
५३ योजनांचे पुनर्मुल्यांकन
कोविडकाळात चारशे मुलांना आतापर्यंत पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे. कोविडकाळात विधवा झालेल्या भगिनींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन वात्सल्य’सारख्या योजना हाती घेतानाच महिला व बालविकास विभागाच्या ५३ योजनांचे पुनर्मुल्यांकन होत असून, आवश्यक निधीही प्राप्त होत आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
प्रदर्शनात दिवाळीसाठी सजावटीच्या अनेकविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- दिवाळीत पावसाची शक्यता, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार
- दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे
- जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
- एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ