निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. या फुलांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची योग्य निवड, बाजारपेठेनुसार जातीची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोगनियंत्रण करणे गरजेचे आहे.
निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. लागवड एप्रिल-मे महिन्यात करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीस वापरल्यास फुले येण्यास सहा ते सात महिने लागतात. निवडलेल्या कंदांवर लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया करावी.
लागवडीसाठी सरी-वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी हेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. सरी, वरंब्यावर 30 सें. मी. x 30 सें. मी. अंतरावर कंदांची लागवड करावी. वाफे शक्यतो तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे करावेत. सपाट वाफ्यात लागवड करताना दोन ओळींत 30 सें. मी. आणि दोन कंदांमध्ये 25 सें. मी. अंतर ठेवावे. कंद जमिनीत पाच ते सात सें. मी. खोल पुरावेत. निमुळता भाग वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकावेत आणि शेतात त्वरित पाणी द्यावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी 200 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि 1/4 नत्राचा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. राहिलेले नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावे.
जाती –
व्हेरिगेटेड – या प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत
सिंगल – या प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात व त्यांचा वापर हारांमध्ये व गजऱ्यांमध्ये केला जातो.
डबल – या प्रकारच्या निशिगंधाच्या फुलदांड्याचा वापर पुष्परचनेमध्ये व बुकेमध्ये केला जातो.
महत्वाच्या बातम्या –