फूलपिकाची ओळख व क्षेत्र –
जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला.
चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांत या फुलाची लागवड केली जाते. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात शेवंतीच्या लागवडीखाली सुमारे ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्र असून, शेवंतीच्या लागवडीत नगर जिल्हा अग्रेसर आहे. पुणे, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यांतही लागवड थोड्या-फार प्रमाणात होते.
शेवंतीचे महत्त्व –
महाराष्ट्रात विशेषतः दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईत शेवंतीच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मनाला मोहिनी घालणारा मंद सुगंध या गुणधर्मामुळे शेवंतीची फुले विशेष लोकप्रिय आहेत. त्यामुळे फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर हार, वेण्या, माळा, गुच्छ तयार करण्यासाठी करतात. शिवाय फुलदाणी ठेवण्यासाठीही वापर होतो. शेवंतीच्या मोठ्या आकाराची फुले मोठ्या शहरांतील प्रमुख हॉटेल्समध्ये कट फ्लॉव्हर्स म्हणून सजावटीसाठी वापरली जातात. या कारणांमुळे शेवंतीचे व्यापारी महत्त्व व खप वाढतच आहे.
लागवड तंत्रज्ञान –
- शेवंती पिकासाठी योग्य जमिनीची निवड नेहमीच फायदेशीर ठरते. ज्या जमिनीचा सामू साडेसहा ते सात आहे, अशा जमिनी लागवडीसाठी चांगल्या असतात.
- मध्यम हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
- पावसाळ्यात शेतात जास्त काळ पाणी साठून राहिल्यास उभे पीक नुकसानीत जाते. म्हणजेच पाण्याचा योग्य निचरा न होणारी जमीन या पिकाला मानवत नाही. म्हणून शेवंतीसाठी अत्यंत भारी जमीन निवडू नये.
हवामान –
शेवंती हे लहान दिवसांचे पीक आहे. म्हणजेच शेवंतीला फुले येण्यासाठी लहान दिवस व कमी तापमानाची आवश्यकता असते. सुरवातीच्या वाढीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश व मोठा दिवस असणे आवश्यक आहे. शेवंतीच्या वाढीसाठी २० ते ३० अंश से., तर फुले येण्यासाठी १० ते १७ सें. अंश तापमानाची आवश्यकता असते.
शेवंतीची सुरवातीची वाढ जोमदार झाल्यास उत्पादन भरपूर व दर्जेदार मिळते. जास्त आर्द्रता व भरपूर सतत पडणारा पाऊस या पिकाला मानवत नाही. हलका ते मध्यम पडणारा पाऊस शेवंतीसाठी पोषक ठरतो. दीर्घकाळ पडणाऱ्या पावसामुळे शेवंती मूळबुजव्या रोगास बळी पडते.
लागवड –
- लागवडीची वेळ पिकाची वाढ व फुलांवर येण्याचा काळ लक्षात घेऊन ठरवावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड लवकर अथवा उशिरा करता येते.
- महाराष्ट्रात शेवंतीची लागवड एप्रिल-मे महिन्यात करतात. या लागवडीपासून दसरा-दिवाळी सणांच्या काळात फुले उपलब्ध होतात. या लागवडीसाठी सुरवातीच्या काळात पाणी उपलब्ध असेल, तरच ही लागवड करता येते.
- पाण्याची उपलब्धता नसेल, तर जून-जुलैमध्ये लागवड करता येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर केलेल्या लागवडीस डिसेंबरपासून पुढे फुले येतात. म्हणजे नाताळ सण व लग्नसमारंभासाठी ती उपलब्ध होतात.
जमीन –
लागवडीसाठी प्रथमतः जमीन उभी-आडवी नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीच्या उताराला आडव्या ६० सेंमी अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत. लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्या निरोगी काश्या वापराव्यात. लागवड ही सरीच्या दोन्ही बाजूस ३० सेंमी अंतरावर बगलेत करावी. लागवड शक्यतो दुपारची उन्हे कमी झाल्यावर करावी, म्हणजे रोपांची मर कमी होते.
जाती –
जगात शेवंतीच्या १५ ते २० हजार जाती असून, भारतात सुमारे ५०० जाती आढळतात. महाराष्ट्रात सोनाली तारा, बग्गी, झिप्री, राजा, पांढरी व पिवळी रेवडी, शरदमाला, बंगळूर, रतलाम चंद्रमा आदी जाती लागवडीखाली आहेत. फुलांचा रंग, आकार आणि उपयोग यावरून शेवंतीच्या जातीचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.
जातींचे नाव | रंग | उपयोग |
झिप्री, सोनाली तारा, पिवळी रेवडी | पिवळा | सुट्या फुलांसाठी |
राजा, पांढरी रेवडी, बग्गी, शरदमाला | पांढरा | सुट्या फुलांसाठी |
ब्युटी, स्नोबॉल, कस्तुरबा गांधी, जेटस्नो | पांढरा | कटफ्लाॅवरसाठी |
चंद्रमा, सोनार बांगला, सुपर जायंट, इंदिरा | पिवळा | कटफ्लाॅवरसाठी |
महात्मा गांधी, क्लासिक ब्युटी, पिकॉक | जांभळट गुलाबी | कटफ्लॉवरसाठी |
शरदशोभा, मिरा, शरदमाला | पांढरा | कुंड्या व ताटवे |
वर्षा, मेघदूत, कारगील, मोहिनी, शरदशृंगार | पांढरा | कुंड्या व ताटवे |
खते –
शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी १५० : २०० : २०० टन शेणखत जमिनीत मिसळावे, लागवडीच्या वेळी हेक्टरी १५०ः २०० : २०० किलो नत्र-स्फुरद-पालाश तर लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने १५० किलो नत्र हेक्टरी याप्रमाणात द्यावे.
पाणी व्यवस्थापन –
लागवड उन्हाळी हंगामात करावयाची असल्याने पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीपासून पाऊस सुरू होईपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी द्यावे. फुले येण्याच्या व फुलण्याच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळी हंगामात १२ ते १५ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे जरूर तेवढे पाणी द्यावे. जरुरीपेक्षा जास्त पाणी देऊ नये. जादा झालेले पाणी खोडाच्या तळाशी सरीत साठून राहिल्यास मूळकुज रोग होतो. म्हणून पावसाळ्याच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
आंतरमशागत –
वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. निंदणीमुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाची जोमदार वाढ होते. झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा खुडण्याचा प्रघात आहे. शेंडा खुडण्याचे काम लागवडीनंतर साधारणतः चौथ्या आठवड्यानंतर करावे. शेंडा खुडल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
फुलांची काढणी व उत्पादन –
शेवंतीच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करतात. शक्यतो फुले सूर्योदयापूर्वी काढावीत. उमललेली फुले उशिरा काढल्यास रंग फिका पडतो व वजनही कमी भरते. जातीनुसार फुलांची काढणी लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी सुरू होते. ती पुढे एक महिना चालते. लवकर उमलणाऱ्या जातींचे एकूण चार ते सहा, तर उशिरा उमलणाऱ्या जातींचे आठ ते दहा तोडे होतात. हेक्टरी साधारणतः सात ते १३ टनांपर्यंत सुट्या फुलांचे उत्पादन मिळते. फुलांचे पॅकिंग बांबूच्या करंड्या किंवा पोत्यांत केले जाते. लांबच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या करंड्यांचा, तर जवळच्या बाजारपेठेसाठी पोत्यांचा उपयोग पॅकिंगसाठी करतात.
पीक संरक्षण –
- शेवंतीवर मर व पानावरील ठिपके हे प्रमुख दोन रोग आढळतात. मर रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळापासून ते फुले येण्याच्या कालावधीपर्यंत केव्हाही होऊ शकतो. प्रादुर्भावामुळे झाडांची खोडे तपकिरी होऊन पाने पिवळी पडून निस्तेज व मऊ होतात. काही दिवसांत झाड मरते. मर रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी झाडाच्या मुळाशी मॅंकोझेब ०.२ टक्के प्रमाणात किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड ०.३ टक्के प्रमाणात द्रावण ओतावे.
- पानांवरील ठिपके हा रोग पावसाळी दमट हवामानात आढळतो. या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीलगतच्या पानांवर होतो. पानांवर काळपट तपकिरी गोलाकार ठिपके पडतात. ते हळूहळू मोठे होतात. परिणामी, संपूर्ण पान करपते. या रोगाचा प्रसार बुंध्याकडून शेंड्याकडे होत जातो. दुर्लक्ष झाल्यास कळ्या व फुलेदेखील या रोगाला बळी पडतात. रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी मॅंकोझेब ०.२ टक्के किंवा कार्बेनडॅझीम ०.१ टक्के, क्लोरोथॅलोनील ०.२ टक्के यापैकी बुरशीनाशकांची आलटून पालटून गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- शेवंतीवर मावा व फूलकिडे या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पाने व फुलांना उपद्रव करतात, त्यामुळे फुलांची गुणवत्ता बिघडते. शिफारसीप्रमाणे त्यांचे नियंत्रण करावे. पानाच्या खालच्या बाजूने जाळ्या तयार करून पाने गुंडाळणारी कोळी कीडही आढळते. पाण्यात विरघळणारे गंधक तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- अंगावर केस असणाऱ्या अस्वल अळीचा प्रादुर्भाव शेवंतीवर पावसाळ्यात आढळतो. ही कीड पाने खाते व पिकाचे मोठे नुकसान करते. क्विनॉलफॉस दोन मिली प्रतिलिटर प्रमाणात फवारल्यास या किडीचे नियंत्रण होते.
महत्वाच्या बातम्या –