पुणे – लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत; त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महंमदवाडी, हडपसर येथील पुणे महानगर पालिकेच्या कै. दशरथ बळीबा भानुगरे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, सचिन अहिर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
नगरसेवकांनी आपण लोकांचे सेवक आहोत या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे असे सांगून मंत्री श्री. शिंदे म्हणाले, जनतेच्या समस्या सोडवणे ही आपली जबाबदारी असल्याच्या भूमिकेतूनच लोकप्रतिनिधींनी काम करावे. लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत; त्यासाठी आपल्यातील सेवभावना कायम जिवंत ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोना संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही असे सांगून मंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोविड संकटात पहिली लाट त्यानंतर भयानक अशी दुसरी लाट आली. आता कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनीच मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे आदी काळजी घेणे आवश्यक आहे. यापुढेही दक्षता बाळगून सर्वांनी कोविडला हरवावे, असे आवाहन त्यांनी केले. कोविड काळात डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस तसेच अन्य यंत्रणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिल्याचा उल्लेख करून त्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचेही श्री. शिंदे म्हणाले.
नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी प्रास्ताविकात महंमदवाडी तसेच परिसरातील विकासकामांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान कोविड काळात उत्कृष्ट आरोग्यसेवा बजावलेल्या डॉ. दिलीप माने, डॉ. सचिन आबने, डॉ. मंगेश वाघ, डॉ. अशोक जैन, डॉ. राज कोद्रे, डॉ. पूनम कोद्रे, डॉ. श्रुती गोडबोले, डॉ. वंदना आबने, डॉ. मनीषा सोनवणे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. नितीन नेटके, डॉ. संपत डुंबरे पाटील यांचा विशेष कोविड-१९ योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.
प्रारंभी रुग्णालय इमारत, कै. मधुकर रंगुजी घुले (पाटील) भाजी मंडई इमारतीचे तसेच स.नं. 17,18 येथून जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण, तुकाई दर्शन ते साई विहार नेहरू पार्कला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकणे, पालखी रस्ता भूमिगत गटर विकसित करणे या कामांचा औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या –
- बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!