ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्या – सुनील केदार

नागपूर – पिण्याचे शुध्द पाणी नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. जिल्ह्यातील अनेक गावांच्या नळयोजना पूर्ण झाल्या नाही. तसेच त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. यासर्व नळ योजनांना  स्थानिक जिल्हा परिषद सदस्यासोबत जीवन प्राधिकारणाच्या उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट देवून तपासणी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या  सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा  व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी श्री. केदार  बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी  विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नागपूर सुधार प्रन्यासचे अरविंद काटकर, जि. प. शिक्षण सभापती  भारती पाटील, जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाळे, कुंदा राऊत यावेळी उपस्थित होते.

कोविड महामारीमुळे अनेक ग्रामपंचायतीच्या नळयोजनांचे काम प्रलंबित आहेत. तसेच संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणाने या कामास प्राधान्य देवून कामास गती द्यावी. आणखी किती वर्ष ग्रामीण भागातील नागरिकांना  आपण शुध्द पाण्यापासून यंत्रणा वंचित ठेवणार आहोत. यासाठी पदाधिकारी तसेच अधिकारी यांनी चिंतन करुन सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, असे श्री. केदार म्हणाले.

ज्या ग्रामपंचातीला महानगर पालिका जास्त दराने पाणी देत आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना कमी दरात व ग्रामीणांना जास्त दरात पाणी उपलब्ध होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोकारा ग्रामपंचायतीच्या नळ योजनेचे नादुरुस्त पाईप लाईनचे काम तात्काळ करण्यात यावे.  सर्व ग्रामपंचायती व जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नळ योजनेचे काम करावे व नळ योजना दुरुस्तीसह हस्तांतरण कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक असल्याने ज्या गावातील नळ योजनेचे पाणी अशुध्द आहे. तेथील पाणी तपासण्यासाठी पथकाची नियुक्ती करा व अहवाल सादर करा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोकारा, सुराबर्डी, खरबी, बिडगाव, तरोडी (बु.) मनसर, रामटेक, दवलामेटी, रनाळा, येरखेडा, भिलगाव, डिगडोह, इसासनी आदी ग्रामपंचायतींच्या नळयोजनांचा आढावा श्री. केदार यांनी घेतला. यावेळी जि.प सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच यांनी आपल्या गावातील समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. त्याबाबत योग्यती चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य, पं.स. सदस्य तसेच सरपंच, लोकप्रतिनीधी व पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –