गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.
शेणखत वापरताना घ्या ‘ही’ काळजी
- लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात व खड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असले शेण चांगले कुजलेले असावे. अशा शेणामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे व नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी अवस्था आढळतात. ज्यास बरेचसे शेतकरी ‘शेणकिडे’ म्हणून संबोधतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात.
- भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा व उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येईल. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
- उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.
- मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घातली जातात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे हुमणीच्या अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.
- काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात.
- बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरते. तेंव्हा शेणखत वापरा पण काळजी घ्या.
महत्वाच्या बातम्या –
- ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? घ्या जाणून
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर ‘या’ नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असून शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारावेत – अमित देशमुख
- कारले लागवड व वाण, माहित करून घ्या
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा