असे करावे हरितगृहातीलपिकांचे पाणी व्यवस्थापन

महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारीक सिंचन पध्दतीमध्ये सारा, सरी वरंबा, आळे पध्दत तसेच मोकाट पध्दतीचा वापर होताना दिसतो. या पध्दतीद्वारे केवळ 30-40 टक्के पाण्याची कार्यक्षमता मिळते व पाण्याचा अपव्यय होतो. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची वाढती गरज लक्षात घेता मर्यादीत क्षेत्रातुन जास्तीत जास्त उत्पादन काढणीसाठी उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करणे व पर्यायाने पाण्याची कार्यक्षमता वाढविणे हे एक आव्हान झाले आहे. यासाठी आधुनिक सिंचन पध्दतीचा वापर केला जातो. हरितगृहात पिकांना पाणी देण्यासाठी प्रामुख्याने ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केला जातो. जमिनीची प्रत, पिकांचा प्रकार, वय, मुळांची वाढ, बाष्पीभवनाचा वेग इ. गोष्टीं विचार करुन पिकांच्या मुळाजवळ थोडे थोडे पाणी थेंबाथेंबाने समप्रमाणात देणे या पध्दतीला ठिबक सिंचन पध्दत असे म्हणतात.

ठिबक सिंचन पध्दतीमुळे पाण्याची 40-50 टक्के बचत, उत्पादनात 15-30 टक्के वाढ, विद्राव्य खतांचा वापर व बचत, तणांची कमी वाढ, मजुरांची बचत असे इतर फायदे होतात. हरितगृहामध्ये मुख्यत्वे गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ॲथुरिंयम, ऑकिड लिलीयम ही फुलपिके घेतली जातात. तसेच हिरवी व रंगीत ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी ही भाजीपाला पिके घेतली जातात. हरितगृहातील या फुले व भाजीपाला पिकांसाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. हरितगृहामध्ये फुले व भाजीपाला लागवडीसाठी मुख्यत्वे मातीचा वापर होतो. परंतु काही शेतकऱ्यांकडे व प्रकल्पामध्ये कोकोपीट या माध्यमाचा वापर होताना आढळुन येतो. गुलाब व जरबेरा या फुलांची दोन्ही माध्यमांमध्ये लागवड केली जाते. कार्नेशन व भाजीपाला ही पिके मातीमध्ये घेतली जातात. या दोन्ही माध्यमासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केला जातो.

हरितगृहामध्ये माती व कोकोपीट या दोन्ही माध्यमांचा वापर पिक लागवडीसाठी उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्प, कृषि महाविद्यालय, पुणे येथे करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामध्ये खते व पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आलेली आहे व त्याद्वारे खते व पाणी यांचे व्यवस्थापन केले जाते. हरितगृहात मातीमध्ये लागवड केलेल्या फुले व भाजीपाला पिकांसाठी ऑनलाईन अथवा इनलाईन ठिबक पध्दतीचा वापर केला जातो. त्यासाठी एक ते दीड फुट अंतरावर पिकातील अंतरानुसार ड्रिपर लावलेले असतात. त्या ड्रिपरचा प्रवाह साधारणपणे ताशी 2 ते 4 लिटर इतका असतो. जरबेरा व गुलाब या पिकांसाठी एका गादीवाफ्यावरील दोन ओळींसाठी दोन ठिबकच्या नळ्यांचा वापर केला जातो. मातीमध्ये लागवड केलेल्या पिकांसाठी दररोज साधारणपणे 2 ते 4 लि.प्रती चौ.मी. इतके पाणी पिकाच्या गरजेनुसार व हंगामानुसार दिले जाते. हरितगृहातील कोकोपीटमध्ये लागवड करण्यासाठी कोकोपीटने भरलेल्या कुंड्या लोखंडी स्टँडवर ठेवलेल्या असतात. कोकोपीटमध्ये लागवड केलेल्या जरबेरा व गुलाब पिकांसाठी पेग पध्दतीचा वापर केला जातो. जरबेरासाठी प्रत्येक कुंडीतील एका झाडास एक पेग लावलेला असतो. ताशी 8 लि. प्रवाह असलेल्या एका ड्रिपरला चार मायक्रोट्युब जोडुन त्याला 4 पेग लावुन चार झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली जाते.

हरितगृहामध्ये गुलाबासाठी प्रत्येक कुंडीमध्ये 2 झाडे असल्यामुळे दोन पेगचा वापर करण्यात येतो. हे पेग मायक्रोट्युबमधुन काढुन स्वच्छ करता येतात. जर पेगला पाणी येत नसेल तर वेळोवेळी हे पेग मायक्रोट्युबमधून काढुन स्वच्छ करणे गरजेचे असते. कोकोपीट लागवड केलेल्या ठिकाणी स्वयंचलित पाणी आणि खते देणाऱ्या यंत्राचा वापर केला जातो. कोकोपीट हे माध्यम म्हणुन वापरले तर त्यासाठी मातीपेक्षा खर्च जास्त असतो. म्हणुनच कोकोपीट माध्यम व स्वयंचलित यंत्रणा हे ज्यांना परवडतील अशा शेतकऱ्यांकडे अथवा मोठ्या व्यवसायीक प्रकल्पांमध्ये वापरले जाते. कोकोपीट माध्यमसाठी खते व पाणी यांचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी विद्युत वाहकता (ए.उ.) आणि सामू (कि) यांचे नियंत्रण करुन पिकाला पाणी दिले जाते. त्यासाठी स्वयंचलित खते व पाणी देणाऱ्या यंत्राद्वारे विद्युत वाहकता व सामु यांचे योग्य ते नियंत्रण करुन देणाऱ्या यंत्राद्वारे विद्युत वाहकता व सामू यांचे योग्य ते नियंत्रण करुन खते व पाणी दिले जाते.

कोकोपीट माध्यमासाठी साधारपणपणे 1 ते 1.6 इतकी विद्युत वाहकता व सामु 5.5 ते 5.8 च्या दरम्यान असावा लागतो हे सर्व स्वंचलित यंत्राद्वारे शक्य असल्याने कोकोपीटसाठी खते व पाणी देण्यासाठी त्याचा वापर केला जातो.  कोकोपीटमध्ये लागवड केलेल्या पिकासाठी एकाच वेळेस पाणी न देता साधारणपणे दिड तासाच्या अंतराने दररोज पिकाची गरज व हंगामानुसार 5 ते 6 वेळा पाणी दिले जाते. कोकोपीटमध्ये पाणी व खते दिल्यानंतर साधारपणे 30 ते 35 टक्के निचरा होणे गरजेचे असते. आवश्‍यक तो निचरा झाला नाही तर पाणी व खते दिलेल्या कोकोपीट माध्यमाची विद्युत वाहकता वाढण्याची शक्यता असते. कोकोपीटमध्ये एका वेळेस एका झाडास 70 ते 80 मि.ली पाणी दिले जाते, म्हणजेच एका झाडास एका दिवसात हंगामानुसार साधारणपणे एकुण 5 ते 6 वेळेस पाणी दिले असता 400 ते 500 मि.ली. एवढे पाणी दिले जाते. यासाठी वापरावयात आलेल्या पेग पध्दतीमध्ये ताशी 2 लि. इतक्या प्रवाहाने साधारणपणे 1 ते 1.5 कि.ग्रॅ. प्रती चौ.मी. इतक्या दाबाने पाणी दिले जाते.   शेडनेटमधील अँथुरियम आणि ऑकिड या पिकांसाठी कोकोशेल या माध्यमाचा वापर केला जातो. अँथुरियमसाठी सुक्ष्म तुषार सिंचन अथवा सुक्ष्मजेट पध्दतीचा वापर केला जातो. या पध्दतीद्वारे पाणी देण्यासाठी साधारणपणे 1.5 ते 2 कि.ग्रॅ प्रती चौ.मी. इत्याक्या दाबाची गरज असते. हरितगृहातील पिक व माध्यमानुसार ठिबक सिंचन पध्दतीचा प्रकार निवडुन त्याप्रमाणे खते व पाणी देण्याचे नियोजन करावे.

महत्वाच्या बातम्या –