गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे

पुणे – जागतिक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वतोपरी मदत करून जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, निबंधक इंदिरा आसावार आदी उपस्थित होते.

देश व राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाचा नावलौकीक वाढविला आहे, असे सांगून श्री. मुंडे म्हणाले, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना संधी तसेच आवश्यक साधने उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी राज्यातच नाही तर देशपातळीवरही चमकतात, ही कामगिरी कौतुकास्पद आहे. बार्टीच्या माध्यमातून समाजातील अनेक विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. बार्टीमार्फत यशदामध्ये 30 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्येही वाढ करण्यात येणार असून बार्टीच्या संशोधन व प्रशिक्षण कार्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या संख्येतही 200 विद्यार्थ्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, विद्यार्थी-विद्यार्थीनींना जागतिक पातळीवर मागणी असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी बार्टीचे भव्य पंचतारांकित प्रशिक्षण केंद्र उभे करण्यात येणार आहे. बार्टीच्या माध्यमातून पुढच्या कालावधीत अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि  विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत अधिक संख्येने उत्तीर्ण होण्याच्यादृष्टीने बार्टीने व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी सर्वोत्तम काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने गौरव होणे हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याच्या भावना गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुहास गाडे, गौरव इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बार्टीचे महासंचालक श्री. गजभिये यांनी बार्टीच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –