फळबागेव्यतिरिक्त इतर पिकेही ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्न करणार – कृषिमंत्री

मुंबई – राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

ठिबक सिंचन असोसिएशन सोबत विविध विषयांवर मंत्रालयात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवले, सहसचिव सुशील खोडवेकर, फलोत्पादन संचालक कैलास मोते, उपसचिव श्रीकांत आंडगे आदींसह ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादक यावेळी उपस्थित होते.

राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान कमाल 5  हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास मान्यता दिली आहे. त्याचा लाभ राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या फळबागेसाठी ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर पिकांनाही ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादक, विक्रेते यांनीही त्याची निकड शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी केले. राज्यामध्ये आतापर्यंत 25.72 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून या नवीन योजनेमुळे त्यामध्ये निश्चितपणे वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा भागात कापूस पीक लागवडीपूर्वी कृषि विभाग तसेच या उत्पादकांनीही तसेच ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म तसेच ठिबक सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही आवश्यकता पटवून देण्याची गरज आहे. केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता ठिबक सिंचन असोसिएशनने  विक्रीपश्चात व्यवस्थापन कसे करावे, यासंदर्भातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ठिबक सिंचन प्रणालीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी कृषि विभाग लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांच्याच लाभासाठी ही योजना आहे. मात्र, यात साखळी निर्माण होणार नाही, याची दक्षता कृषि विभाग घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठिबक सिंचन अनुदानासाठी अधिक निधी कसा उपलब्ध होईल, हे पाहिले जाईल. ज्यांचे अनुदान प्रलंबित आहे, त्यांनाही लवकरच ते अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही होत असल्याची माहिती, सचिव श्री. डवले यांनी दिली.

यावेळी ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदानाचा निर्णय घेतल्याबद्दल ठिबक सिंचन असोसिएशनच्या वतीने मंत्री श्री. भुसे आणि सचिव श्री. डवले यांचा सत्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –