दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या – बच्चू कडू

अकोला – जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त माहितीनुसार दिव्यांगांना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ प्राधान्याने द्या, असे निर्देश  पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

दिव्यांगाकरीता असलेला पाच टक्के निधी खर्चाबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,अकोट उपवनसंरक्षक नवल रेडी, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दिव्यांगाकरीता प्राप्त झालेल्या दिव्यांग निधी खर्चाचा महानगरपालिका, नगरपरीषद व सर्व पंचायत समिती निहाय आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी  निर्देश दिले की, दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राखीव निधी तातडीने खर्च करुन दिव्यांगाना अंत्योदय योजनाचा प्राधान्याने लाभ द्या. तसेच बोगस अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्यावर कार्यवाही करुन दिव्यांगाना या योजनेत सामावून घ्या.  जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्व्हेक्षण घरोघरी जावून तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षण करताना प्राप्त होणारा डाटा हा एकत्रीत स्वरुपात तयार करुन दिव्यांगांच्या कल्याणासाठी  राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ त्यांच्याप्रयत्न पोहोचवा.  शासकीय व निम्म शासकीय विभागात दिव्यांगाना आरक्षण दिले असल्याची खात्री करा. तसेच जिल्ह्यात दिव्यांगाचा अनुशेष राहणार नाही याची दक्षता घ्या, असेही निर्देश यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या –