दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करून महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला, पण केंद्राचा शिपाईसुद्धा आला नाही

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीची मदत दिली जाईल, असे असा शब्द महाविकास आघाडीने दिला होता. त्यानूसार राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत जाहीर केली आणि पहिला टप्पाही जिल्ह्यांना वर्ग केला. बीड जिल्ह्यातील सरासरी १५ टक्के शेतकऱ्यांना मदतही बँक खात्यावर जमा झाली आहे. महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला. मात्र केंद्रातील शिपाईदेखील नुकसान पाहणीसाठी आला नाही आणि पॅकेज काय देतील ? असा प्रश्न पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात ६१ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. काही मंडळांमध्ये १३ ते १४ वेळा अतिवृष्टी झाली , अशी स्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही राहिली. मराठवाड्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात नैसर्गीक आपत्ती मोठी आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल, असा शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे. बीड जिल्ह्याला नुकसानीची पहिला टप्पा ५०२ कोटी रुपयांची मदत मिळाल्याबद्दल मी पालकमंत्री या नात्याने राज्य शासनाचे आभार मानतो.

महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला आहे हे सत्य आहे. पणकेंद्र सरकारकडून दखल घेतली गेली नाही. शेतीची पाहणी करण्यासाठी साधा शिपाईदेखील आलेला नाही? त्यांचे पॅकेज कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राची वाट न पाहता राज्यातील सरकारने तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली, असे पालकमंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले. शेतीचे पंचनामे व मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याच्या कार्यात जिल्हा प्रशासनाचा सिंहाचा वाटा असल्याचे कौतुकही पालकमंत्री मुंडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –