मुंबई – दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
प्रशासनामार्फत नियमितपणे दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी इत्यादी सणांच्या काळात खाद्यतेल, खवा, तयार मिठाई, मिठाईसाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे या अन्नपदार्थांचे उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात. विश्लेषण अहवालात नमूद उल्लघनांनुसार कायद्यातील तरतुदीच्या अनुषांगाने कारवाई केली जाते. अन्न पदार्थांची गुणवत्ता अबाधित रहावी, याकरिता तसेच अन्नपदार्थांच्या भेसळीस आळा बसावा व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
सणासुदीच्या कालावधीत जनजागृती
- ग्राहक व अन्न व्यावसायिकात भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत जागृती करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येतात.
- अन्नपदार्थांत भेसळीस आळा घालण्यासाठी प्रशासनामार्फत राज्यभरात अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते यांच्या नियमित तपासण्या करून नमुने घेण्याची कार्यवाही निरंतर केली जाते .
- सणासुदीच्या काळात विशेष मोहिमा आखून नागरिकांना र्निभेळ व सकस मिठाई, दुध, खवा, मावा, खाद्यतेल इ. अन्न पदार्थ मिळावेत याची खबरदारी घेतली जाते.
- दुध व दुग्धजन्य पदार्थांबाबत जकातनाका मोहिम व अन्य मोहिम आखून छापे टाकून कारवाई केली जाते.
मिठाई बाबत
- उत्पादनाची तारीख आणि अन्न खराब होण्यापूर्वीची तारीख (Date of manufacturing and Best before date) बाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून विना आवेष्टित /खुल्या स्वरूपातील मिठाई ज्या / ट्रे सारख्या भांड्यात विक्रीसाठी ठेवली आहे त्यावर best before तारीख नमूद करणे बंधनकारक असेल. अन्न व्यावसायिक हे या बाबी स्थानिक भाषेत नमूद करु शकतात.
- मिठाई उत्पादकांना याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन तसेच तपासणीवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेने मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी. बेस्ट बिफोर (Best Before) निघून गेलेली मिठाई खरेदी करू नये तसेच खरेदी केलेली मिठाई Best Before तारखेआधीच खाण्यात यावी. त्यानंतर ही मिठाई खाऊ नये. जेणेकरून विषबाधा सारख्या घटना रोखता येतील.
- मिठाई खरेदी करून आणल्यानांतर मिठाईच्या साठवणूकीस योग्य अशा परिस्थितीनुसार (STORAGE CONDITION) साठवणूक करावी. बंगाली व तत्सम मिठाई फ्रीजमध्ये साठवून 8 ते 10 तासांच्या आतच खावी. वास, रंग व चव पाहून मिठाई ताजी असल्याची खात्री करावी.
- मिठाई खरेदी करताना शक्यतो नैसर्गिक खाद्य रंग वापरण्यात आलेली मिठाई विकत घ्यावी. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता, कृत्रिम खाद्यरंग वापरून मिठाई तयार करण्यात येतात. कृत्रिम रंगाचे प्रमाण जास्त असलेल्या मिठाई खाण्याने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याकरिता अशा भडक रंगीत मिठाई खाणे टाळावे.
नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा
- दिवाळीच्या काळात काही विनापरवाना आस्थापनाद्वारे चॉकलेट्स, दिवाळीचे फराळ इत्यादी तयार करून दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. अन्नपदार्थांच्या पॅकेटवर कोणत्याही प्रकारचे लेबल नसते. अशा विनापरवाना आस्थापनांनी अन्न व्यवसाय करणेपुर्वी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा व नियमानुसार अन्नपदार्थांच्या पॅकेटवर लेबल लावावे. जनतेने असे विना लेबेलचे खाद्य पदार्थ खरेदी करणे व खाणे टाळावे.
- ग्राहकांनी पॅकींग किंवा सीलबंद अन्नपदार्थ खरेदी करताना अन्नपदार्थांच्या लेबलवर अन्न पदार्थाचे नाव, घटक पदार्थ, nutritional information, वेज -नॉन वेज लोगो, additives, उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता, वजन, लॉट नं., उत्पादन दिनांक/ पॅकिग दिनांक, Best Before दिनांक / use by date, fssai परवाना /नोंदणी क्रमांक इ . माहिती नमूद असल्याची खात्री करूनच अन्न पदार्थ खरेदी करावीत.
- मिठाई पॅकबंद किवा सीलबंद अन्नपदार्थ, कच्चे अन्नपदार्थ इत्यादी नोंदणी धारक/ परवाना धारक आस्थापनेतूनच खरेदी करावीत. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते शिळे नसल्याची खात्री करूनच खरेदी करावीत व विक्रेत्यांकडून त्याबाबत खरेदी बिल घ्यावे. फेरीवाल्यांकडून खवा, मिठाई घेणे टाळावे. उघड्या वरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.
- तक्रार असेल तर संपर्क करा
- राज्यातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अन्नपदार्थाबाबत घडलेल्या घटना तसेच अन्नपदार्थाच्या गुणवत्तेसंदर्भात जागरूक रहावे तसेच तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. राज्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या gov.in या संकेतस्थळावर Grievance portal वर अतिशय सहज व सोप्या पद्धतीने online तक्रार नोंदवू शकतात. प्राधिकरणाच्या संकेतस्थळाबाबतची माहिती जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचावी म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.
- प्रशासनाचे मुंबई येथील मुख्यालयात 24×7 चे अवलंब करून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. दूरध्वनी क्रमांक 022-26592364/65, 26592373/1820 व फॅक्स नं. 26591959 व ई-मेल – jc-foodhq@gov.in व stenojchq@gmail.com हे आहेत. टोल फ्री क्रमांक 1800222365 हा पण 24×7 च्या धर्तीवर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तसेच नागरीक प्रशासनातील सर्व जिल्हा कार्यालयात दुरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे तसेच लेखी निवेदनाद्वारे संपर्क साधुन भेसळयुक्त पदार्थांबाबत तक्रार नोंदवू शकतात. प्रशासनामार्फत तक्रारीची त्वरीत दाखल घेण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘या’ जिल्ह्यात अनुदान वाटपास सुरुवात
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये काही दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- ऐन दिवाळीत एलपीजी सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ
- दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – अनिल परब यांचे आवाहन
- कच्च्या पेरूचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!