वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा – दत्तात्रय भरणे

नागपूर – वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असून शिकारीला अटकाव करण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या हत्तीच्या कळपाबाबतही यावेळी त्यांनी माहिती घेतली.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते (नागपूर), गिरीष जोशी (अमरावती), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नोडल) नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी. एस. हुडा, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यावेळी उपस्थित होते.

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घ्याव्यात. वाघांचा अधिवास असलेल्या जंगल परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करावी, वाघांच्या हल्ल्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या त्यांना सूचना द्याव्यात. वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घ्यावी. गेल्या काही दिवसात वन्यजीव शिकार, अवयव तस्करीच्या सात प्रकरणांमध्ये 42 जणांना अटक करण्यात आली आहे. यापुढेही अशा कारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यावर भर देण्याच्या  सूचना श्री. भरणे यांनी केल्या.

छत्तीसगड येथून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात आलेल्या हत्तींकडून होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी. स्थानिक नागरिकांना हत्तींपासून दूर राहण्याच्या सूचना द्याव्यात. वन्यजीव-मानव संघर्ष उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी. हत्तींच्या याठिकाणच्या वास्तव्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे श्री. भरणे यांनी सांगितले. तसेच वन विभागातील वन रक्षकाची रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –