अमरावती – ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात आढळलेले रूग्ण व कोविड साथीच्या नव्याने आढळणा-या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर, साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात अधिक जलद व अधिक अचूक तपासणीच्या अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी अद्ययावत यंत्रणा आरोग्य विभाग, प्रयोगशाळांकडे उपलब्ध असण्याच्या दृष्टीने प्रस्ताव द्यावेत. नागरिकांची सुरक्षितता हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, तपासणी व उपचार यंत्रणेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक करंजीकर, डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, साथरोग नियंत्रणासाठी जलद निदान झाल्यास गतीने उपचार करणे शक्य होते. त्यामुळे कोविडकाळात स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळांत जिल्हा नियोजन निधीतून अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली. त्याचा कोविड साथ नियंत्रणासाठी मोठा उपयोग झाला. तथापि, ओमायक्रॉनसारख्या उत्परिवर्तित विषाणूचा राज्यात काही ठिकाणी प्रादुर्भाव व अद्यापही कोविडचे रूग्ण आढळणे या पार्श्वभूमीवर, ‘जिनोम सिक्वेन्सिंग’सारख्या सखोल तपासणी सुविधाही जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे असाव्यात. याबाबतचा आवश्यक निधी, व्यवहार्यता आदी बाबी तपासून तसा प्रस्ताव सादर करावा. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक निधी मिळवून दिला जाईल.
‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा
अमरावती महापालिका क्षेत्रात मंगळवारी नव्याने नऊ कोविडबाधित आढळले. तिस-या लाटेचा धोका अजूनही संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. एका रूग्णामागे संपर्कातील किमान 30 व्यक्तींची तपासणी व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.
व्यापक लसीकरणासाठी राबवलेल्या मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. याबद्दल पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, मोहिमेचा वेग कमी होऊ न देता संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. बुस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्यापही कमी आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे. त्यादृष्टीने भरीव जनजागृती करावी.
कोविड साथ नियंत्रणात आल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. तथापि, मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर या बाबींचा विसर पडता कामा नये. सार्वजनिक ठिकाणी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न झाल्यास कारवाई व्हावी. बसस्थानके, रेल्वेस्थानक अशा ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग व्हावे. ‘रँडम चेकिंग’ही सुरू करावे. सीमावर्ती भागात नाक्यांवर तपासणी करताना लसीकरण झाले किंवा कसे, हे पाहणेही आवश्यक आहे. गत साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली. तथापि, यापुढेही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. फेब्रिकेडेट रूग्णालयाचे फायर ऑडिट पूर्ण करून घ्यावे व ते कार्यान्वित करण्यासाठी गतीने प्रक्रिया राबवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
अमरावती जिल्ह्यात गत दोन साथींच्या काळात सुमारे 8 लक्ष 87 हजार 864 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यात 96 हजार 797 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. त्यातील 95 हजार 193 व्यक्ती ब-या होऊन घरी परतल्या. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 98.3 आहे, अशी माहिती डॉ. साबळे यांनी यावेळी दिली.
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. ८ डिसेंबर २०२१
- रोज मनुक्याचे पाणी पिल्याने होतील ‘या’ समस्या दूर
- आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार
- राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी – सुभाष देसाई
- राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – विजय वडेट्टीवार