पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार योग्य रानबांधणी करावी. संकरित जातीचे बियाणे, खतांची योग्य मात्रा, योग्य मशागत, पिकांसाठी योग्य रानबांधणी, वेळीच कीड-रोग नियंत्रण आणि पाण्याचा पिकाच्या गरजेनुसार वापर केल्यास पिकाचे चांगले उत्पादन मिळते. तसेच उपलब्ध पाण्यात अधिक चांगले पिक घेता येते.
ऊस – उन्हाळी हंगामामध्ये उसाचे पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. कारण उन्हाळ्यात उसाला पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येते म्हणून जमिनीच्या मगदुराप्रमाणे दहा दिवसांच्या अंतराने उसाला पाणी द्यावे.
शक्य झाल्यास सरीमध्ये पाचटाचे आच्छादन द्यावे. एक आड एक सरी करून पाणी देऊन पाण्यात बचत करता येते. ठिबक संचाने दिवसाआड पाणी द्यावे. तुषार सिंचन तसेच रेनगनने पाणी देता येते. त्याचबरोबर ३० – ३५ % पाण्याची बचत करता येते.
कांदा – महत्त्वाचे भाजीपाला पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. साधारणपणे ७०-७५ सें.मी. पाण्याची गरज या पिकाला आहे. पीकवाढीच्या कालावधीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
कापूस – बागायती कपाशीची लागवड उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यांत करतात. कपाशीसाठी जमिनीत खोली ९० सें.मी. ते एक मीटर असावी. बाष्पीभवन गुणांकाप्रमाणे सात सें.मी. खोलीचे पाणी 0.७५ गुणांकास दिल्यास कपाशीचे उत्पन्न चांगले मिळते. कपाशी पिकाच्या फांद्या लागणे, पाने लागणे, फुले येणे, बोंडाची वाढ होणे या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था होय. या वेळेस कपाशी पिकास पाणी कमी पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. कपाशी पिकास वाणाप्रमाणे एकूण ७० ते ८५ सें.मी. पाणी लागते.
भुईमूग – उन्हाळी भुईमुगाची लागवड साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करतात. उन्हाळी भुईमुगास ७५ ते ८० सें.मी. पाणी लागते. हे पाणी १२ ते १५ पाळ्यांद्वारे द्यावे लागते. सर्वसाधारणपणे फांद्या फुटण्याची अवस्था फुले, आऱ्या लागणे, शेंगा लागणे व शेंगांत दाणे भरणे या महत्त्वाच्या अवस्था या वेळेस पाणी देणे आवश्यक आहे. परंतु उन्हाळी भुईमुगास कुठल्याही अवस्थेत पाण्याचा ताण सहन होत नाही. म्हणून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
केळी – केळीसाठी ठिबक सिंचन असल्यास दिवसाआड साधारणपणे तीन ते चार तास बाष्पीभवनाचा विचार करून संच चालवावा. शक्यतोवर बागेच्या दक्षिण-पश्चिम दिशेला शेवरी लावून बागेचे वाऱ्यापासून संरक्षण करावे. बाष्परोधक रसायन केवोलिनचा वापर करावा, त्या मुळे बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याचे नियोजन साधता येते.
मका – उन्हाळ्यामध्ये दूध-दुभत्या जनावरांच्या हिरव्या चाऱ्यांची सोय म्हणून मका या पिकाला वगळून चालणार नाही. मका हे पीक धान्य आणि चाऱ्यासाठी घेतात. हे पिक तीनही हंगामांत घेता येते. बाष्पीभवनावर आधारित हवामानाच्या 0.६० बाष्पांकाप्रमाणे ८ सें.मी. खोलीचे प्रमाण आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दिल्यास उत्पादन चांगले मिळते.
महत्वाच्या बातम्या –