झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.
झेंडू लागवड कशी करावी –
झेंडू लागवड 18 × 30, 40 × 90, 30 × 30 अशा अंतरावर लागवड केली जाते.
गादीवाफ्यावर लागवड करताना जमिनीची नांगरणी कोळपणी करावी.
30 ते 60 सेंटिमीटर रुंद आणि 30 सेंटिमीटर उंच गादीवाफे तयार करून घेतले जातात.
दोन वाक्यांमध्ये 45 सेंटिमीटर इतका अंतर ठेवलं जातं आणि मग त्यावर 45 सेंटिमीटर अशा अंतराने लागवड केली जाते.
जमीन व हवामान –
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेन्दुपासून मिळते.
झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेन्दुसाठी सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.
झेंडूच्या जाती –
या फुलाच्या आफ्रिकन झेंडू फ्रेंच झेंडू संकरित अशा जाती असतात. त्यातही उंची फुलांचा रंग वाढीची पद्धत यानुसार पोटजाती आहेत झेंडूची लागवड बाराही महिन्यांच्या हवामान केली जाऊ शकते.
या फुलाला खरं तर थंड आणि मध्यम तापमान जास्त मानवते. त्यात त्याची वाढ आणि उत्पादन चांगलं मिळतं पण तरीही देशभरात सर्वच वातावरणात याची लागवड केली जाते.
लागवड पूर्व तयारी –
लागवडीपूर्व जमिनीची २ ते ३ वेळा खोलवर नांगरट, २ ते ३ वेळा फणणी करून धसकटे व हरळीच्या काशा वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून ५० किलो नत्र, २०० किलो. स्फुरद व २०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीच पूर्णपणे मिसळून घ्यावे. व नंतर ६० से. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सर्यासची नाके तोडून पाणी पुराव्थाच्या सोयीप्रमाणे वाफे करून घ्यावेत.
खते –
आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश याप्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीन.
रोपवाटिका
रोपवाटिका करण्यापूर्वी ३ X १ मी. या आकारमानाचे व २० से. मी. उंचीचे २० गादीवाफे करावेत. त्यामध्ये प्रत्येक वाफ्यात १९:१९:१९ हे ५० ग्रॅम (रासायनिक खत) व ८ ते १० किलो चाळलेले शेणखत मिसळावे. त्यात ५ ग्रॅम प्रति चौ. मी. याप्रमाणे फोरेट मिसळून घ्यावे. १० से. मी. अंतरावर दक्षिण-उत्तर ओळी खुरप्याच्या सहाय्याने ०.५ से. मी. खोल करून घ्याव्यात त्यामध्ये दोन बियाण्यातील अंतर १ इंच ठेवून बियाणे पेरावे. हे बियाणे वस्रगाळ केलेली माती, शेणखत व वाळू यांचे २:१:१ याप्रमाणे मिश्रण करून या मिश्रणाने बी झाकून टाकावे. त्यावर रोज सकाळी व सायंकाळी पाण्याचा फवारा मारावा व बियाणे उगवेपर्यंत गादी वाफे, गवत पालापाचोळा किंवा पाने झाकून घ्यावे. वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावीत. त्यापेक्षा जास्त पाणी देखील होऊ देऊ नये, किंवा पाणी कमी देखील पडू देऊ नये. रोपे तयार झाल्यानंतर मुळांसहित काढावीत. वाफे वापसा अवस्थेत असतानाच रोपे काढावीत. बियाणे पेरणीपासून २५ ते ३० दिवसात रोपे लागवडीस तयार होतात.
पीक संरक्षण (रोपवाटिका) –
सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याने कार्बन ड्रेझीम २० ग्रॅम किंवा कॅपटॉप २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात.
पाणी –
हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
उत्पादन –
झेंडूंच्या फुलांचे हेक्टरी १२ ते १५ टन उत्पादन मिळते. संकरीत जातींची लागवड केल्यास प्रति हेक्टरी १८ ते २० टन उत्पादन मिळते.
हे लक्षात ठेवा –
- बाजारपेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने लागवड करा.
- रोपे तयार करतांना जास्त काळजी घ्या. सुदृढ रोपांचीच लागवडीसाठी निवड करा.
- ज्या जमिनीत सुतकृमींचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या ठिकाणी झेंडूची लागवड करा.
- पाणथळ जमिनीत झेंडूची लागवड करू नका.