मुंबई – विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तीन नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीव्दारे जालना येथून सहभागी झाले.
वर्षा निवासस्थानावरील समिती कक्षात मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ.राहुल पंडित आदी उपस्थित होते.
कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. आपापल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.
नागरिकांनी बेफिकीर होऊ नये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टींगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा.
कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण ठरवावे. दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.
टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांनी ही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या –
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘या’ जिल्ह्यात अनुदान वाटपास सुरुवात
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये काही दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- ऐन दिवाळीत एलपीजी सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ
- दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – अनिल परब यांचे आवाहन
- कच्च्या पेरूचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!