भारतात होते ‘या’ प्रकारची शेती, जाणून घ्या

बागायती शेती – हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात.पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो.

या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.

बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात. पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरून बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.

फुलशेती – फुलशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार्‍या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे; परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्घतीने घेतले जाते. आज व्यावसायिक दृष्ट्या फुलशेती ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नेट् शेड आणि पॉलीहाऊस चा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाधिरत फुलशेती केली जाते. मिल्चींग पेपर वर बेड तयार् करुन विशिष्ट अंतरावर लागवड केली जते. पॉलीहाऊस मध्ये अवघ्या २० गुंठ्यामध्ये वार्षिक ३ लाखांपर्य्ंत उत्पन्न घेता येते.

सेंद्रिय शेती – पिकांची अन्नद्रव्यांची गरज जमिनीतून भागविली जाते. वापरल्या गेलेल्या अन्नद्रव्यांचे मातीत पुनर्भरण करणे त्यामुळे गरजेचे आहे. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना अन्नद्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. पालापाचोळा जमिनीत कुजवून ताग किंवा धैंचा यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून, शेणखत आणि कंपोस्ट खतांचा वापर करून, तसेच इतर सर्व प्रकारचे वनस्पतिजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्यांचे पुनर्भरण करतात.

अशा प्रकारे अन्नद्रव्यांनी समृद्घ केलेल्या जमिनीत जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्घती असे संबोधण्यात येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्याया धान्याची प्रत उच्चदर्जाची असते. सर्व प्रकारच्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर सेंद्रिय शेतीत कटाक्षाने टाळणे ही मुख्य गरज आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य रोगनाशके व कीटकनाशके वापरूनही गरज भागविता येते.

फळबाग शेती – या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते.

फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

महत्वाच्या बातम्या –