कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात लसीकरण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जि.प सभापती राजेंद्र पळसकर, रियाजखा पठाण, मलकापूर नगराध्यक्ष हरीष रावळ, सिं. राजा नगराध्यक्ष श्री. तायडे, पं.स सभापती व लोकप्रतिनिधी, मुस्लीम धर्माचे मौलाना उपस्थित होते.

धर्मगुरूंनी आपआपल्या समाजात लसीकरणासाठी नागरिकांना प्रेरीत करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, धर्मगगुरूंचे समाजातील नागरिक ऐकतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. प्रथम त्यांनी लस घेतली नसल्यास ती घ्यावी. लस घेतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मिडीयातून प्रसारीत करावी. जेणेकरून त्यांचे बघून नागरिक लस घेण्यास येतील. लसीविषयी समाजात असलेले गैरसमजही त्यामुळे दूर होतील. लसीकरण मोहिमेमध्ये जनसहभाग वाढवून तीला चळवळीचे स्वरूप देण्यात यावे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा. सर्व विभागांनी त्यांच्याकडील शासकीय योजनांचा लाभ, कार्यालयातील प्रवेश व कार्यालयाच्या अन्य संदर्भातील बाबींविषयी कोविडचे दोन्ही डोसचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करावे.

ते पुढे म्हणाले, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कुटूंबियांचेसुद्धा लसीकरण पूर्ण करावे. तशा पद्धतीचे बंधन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानात राशन घ्यावयाचे असल्यास लाभार्थ्याने लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य करावे. लसीकरणासाठी प्रत्येक तालुक्याला मेगा कॅम्प घेण्यात यावा. गावनिहाय सुक्ष्म नियोजन करून लस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे. औषध प्रशासन विभागाने केमिस्ट असोसिएशनसोबत समन्वय ठेवून लसीकरण मेळावा घ्यावा. लसीकरण झाल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे किंवा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्यास अशांवर कडक कारवाई करावी. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. लसीबाबत गैरसमज पसरवित असलेल्यांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाई करावी. सोशल मिडीयातून लसीकरणाचे फायदे सांगणारे व्हिडीओ, मेसेज प्रसारीत करावे. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनीही लसीकरण वाढविण्याबाबत सूचना केल्या. तसेच मौलाना, अधिकारी यांनीसुद्धा लसीकरण वाढविण्याविषयी असलेल्या सुचना, अडचणी मांडल्या.  लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली. बैठकीला संबंधित विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –